अलिबाग । भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यासाठी ग्रामपंचायत वाडगांवच्या सरपंच सारिका गणेश पवार यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणामुळे वाडगांव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
देशाच्या राजधानीत पार पडणार्या या राष्ट्रीय सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळणे ही अत्यंत गौरवाची बाब मानली जाते. ग्रामविकास, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गावाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत सरपंच पवार यांची निवड करण्यात आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यानंतर सरपंच सारिका पवार यांचे अभिनंदन करताना, उपसरपंच जयेंद्र भगत, सदस्या सरिता भगत, ग्रा. अधिकारी रिना वर्तक, कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, भविष्यातही गावाच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया सरपंच पवार यांनी व्यक्त केली.