पनवेल । डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कायद्याचा धाक दाखवत खोटी माहिती देऊन एका ज्येष्ठ नागरिकाला व्हिडिओ कॉलद्वारे नजरकैदेत ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे तपासणीच्या बहाण्याने तब्बल 14 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रिजलाल बरनवाल (वय 65) हे सेक्टर 36, कामोठे येथे वास्तव्यास आहेत. 26 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून डिजिटल अरेस्ट असल्याचे सांगत कायदेशीर कारवाईची भीती घातली. तसेच खोटी माहिती देऊन सतत व्हिडिओ कॉलवर ठेवत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
दरम्यान, ‘पैशांची तपासणी करायची आहे’ असे सांगून विविध बँक खात्यांद्वारे 14 लाख रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बरनवाल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास कामोठे पोलीस करत आहेत.