अलिबाग । रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस उगवला तरी जिल्ह्यातील युती, आघाडीबाबतचे चित्र अस्पष्ट आहे. असे असले तरी सर्वच राजकीय पक्षातील रथी-महारथींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी मोठ्याप्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्याने प्रशासनाला टोकन पध्दतीचा अवलंब करावा लागला. आज (21 जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे.मंगळवारी (20 जानेवारी) जिल्हा परिषदेसाठी अलिबाग आंबेपूर गटातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांची पत्नी रसिका केणी यांनी अर्ज दाखल केला आहे.

आवासमधून काँगे्रसकडून राजा ठाकूर यांनी, शहापूरमध्ये राष्ट्रवादीकडून अमित नाईक, चेंढरे गटातून भाजपकडून माजी सदस्या प्रियदर्शनी संजय पाटील, शेकापकडून दर्शना प्रफुल्ल पाटील, थळमधून शेकापकडून सानिका सुरेश घरत, चौलमधून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुरुडमधील कोर्लई मतदारसंघातून भाजप नेते अॅड.महेश मोहिते यांच्या पत्नी मनस्वी मोहिते, पेण तालुक्यातून शिवसेनेच्या पल्लवी प्रसाद भोईर (ठाकरे गट), शेकापकडून संजय जनार्दन जांभळे, भाजपकडून वैकुंठ रविंद्र पाटील व मिलिंद मोरेश्वर पाटील यांनी तर गोरेगाव जिल्हा परिषद गटातून पत्रकार भारत गोरेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर लोहारे गटातून तर नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेकडून विकास गोगावले यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी एकाच वेळी अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली. सकाळपासून उमेदवार व कार्यकर्त्यांनी परिसर फुलून गेला होता. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला टोकन पद्धतीचा अवलंब करावा लागला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती.