कर्जत । कर्जत-कशेळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी कशेळे ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामस्थांनी थेट मुंबईतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्षांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले.
कशेळे-कर्जत या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेषतः कशेळे बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे उखडला असून कशेळे नाका, पेज नदी, वंजारवाडी परिसरात अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पेज नदी पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. ठेकेदारांकडून केवळ तात्पुरती डागडुजी करून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कशेळे गावातील ग्रामस्थ व व्यापारी संघटनांनी स्वखर्चाने कशेळे ते वंजारवाडीदरम्यान मुरूम टाकून खड्डे बुजवले होते.
त्यामुळे काही काळ वाहनचालकांना दिलासा मिळाला होता. मात्र पावसाळ्यानंतर हा मुरुम उडून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून बाजारपेठेतील दुकाने व आजूबाजूच्या घरांमध्ये धूळ साचत आहे. परिणामी नागरिकांना श्वसनविकारांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सरकारी दवाखान्याजवळील खड्ड्यांमुळे दवाखान्यात जाणार्या गरोदर महिलांना मोठा त्रास होत होता. यासंदर्भात कशेळे ग्रामस्थांनी यापूर्वी संबंधित अधिकार्यांना उपोषणाचा इशाराही दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अखेर कशेळे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, राजेंद्र हरपूडे, सचिन राणे, दिनेश हरपूडे आणि विजय शिंदे यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन देत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या. तसेच कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी कर्जतकशेळे रस्त्यावरील सर्व खड्डे पंधरा दिवसांच्या आत बुजवण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.