अलिबाग । देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक अलिबागकडे येऊ लागले असून, या पर्यटकांनी अलिबागची कला संस्कृती, येथील खाद्यसंस्कृती, निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळांचा अनुभव घेत, स्थानिक नागरिकांशी एकरुप होत आहेत. यात अलिबाग बीच शो या उपक्रमाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी केले.
‘रायगड टाइम्स‘कडून 31 डिसेंबरला आयोजित होणार्या बीच शोमुळे पर्यटक येथे अधिक काळ थांबतात आणि अलिबागशी जोडले जातात. गेल्या तीन वर्षांपासून हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडतो हे उल्लेखनीय असल्याचे अॅड.मोहिते यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना अॅड. महेश मोहिते यांनी रायगड टाइम्सचे संपादक राजन वेलकर यांच्या पत्रकारितेचाही गौरव केला.
संपादकीय क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला वेगळा ठसा आणि निर्भीड, रोखठोक पत्रकारिता यामुळे ‘रायगड टाइम्स’ने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘रायगड टाइम्स’च्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व सांस्कृतिक उपक्रमांना प्रभावी व्यासपीठ मिळत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरुड, अलिबागसह विविध समुद्रकिनार्यांवर अशा शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षाही शेवटी अॅड. महेश मोहिते यांनी व्यक्त केली.