पनवेल । महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत चालले आहे. माघार घेण्याच्या अंतिम मुदत शिल्लक असतानाच 78 पैकी 36 प्रभागांमध्ये दुरंगी व तिरंगी लढतींचे चित्र आहे. पनवेल महापालिकेच्या एकूण 78 जागांसाठी तब्बल 400 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
छाननी प्रक्रियेनंतर 343 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. सध्याच्या स्थितीनुसार 16 जागांवर दुरंगी तर 20 जागांवर तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तब्बल 36 जागांवरील लढतींकडे पनवेलकरांचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, माघार कालावधी संपेपर्यंत हे चित्र बदलण्याची दाट शक्यता आहे. काही तिरंगी लढतींमध्ये डमी उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार माघार घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे अंतिम लढतीतील उमेदवारांची संख्या माघार प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे. दरम्यान, काही प्रभागांमध्ये अर्जांची संख्या लक्षणीय असल्याने तेथे लढती अधिक चुरशीच्या ठरणार आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधील एका जागेसाठी 11 अर्ज, प्रभाग क्रमांक 8 (कळंबोली) येथील एका जागेसाठीही 11 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मध्ये एका जागेसाठी 13 अर्ज, प्रभाग क्रमांक 12 मध्ये 10 अर्ज, तर प्रभाग क्रमांक 15 मधील दोन जागांसाठी प्रत्येकी 10 अर्ज आले आहेत.
प्रभाग क्रमांक 18 मधील एका जागेवर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने भाजपचे उमेदवार नितीन जयराम पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर त्यांच्या समर्थकांनी निवडणूकपूर्वीच आनंदोत्सव साजरा केला. मात्र, याच प्रभागातील दुसर्या एका जागेसाठी 9 अर्ज वैध ठरल्याने तेथे अजूनही चुरशीची लढत होण्याची शक्यता कायम आहे. एकूणच, उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी असून बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील काही तास पनवेल महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.