मंगेश काळोखे हत्याकांडातील संशयित , अखेर भरत भगत पोलिसांसमोर हजर

19 Jan 2026 16:51:19
 Panvel
 
खोपोली । खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येतील संशयित असलेले राष्ट्रवादीचे स्थानिक प्रवक्ते भरत भगत 23 दिवसांनंतर अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. काळोखे यांच्या हत्येनंतर ते बेपत्ता होते. पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे काळोखे हत्याप्रकरणातील तपासाची आणखी एक कडी जोडली जाणार आहे.
 
खोपोली येथील शिवसेनेच्या (शिंदे गट) नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे पुढे आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खोपोलीत भेट दिली होती. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार देवकर कुटुंबासोबतच जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांची नावे संशयितांमध्ये पुढे आल्यानंतर खळबळ उडाली होती.
 
खोपोलीकरांसह शिवसेना आणि काळोखे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. रायगड पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत 12 जणांना अटक केली होती. सुपारी घेऊन हत्या करणार्‍या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र सुधाकर घारे आणि भरत भगत पोलिसांच्या हाताला लागत नव्हते.
 
यादरम्यान, पनवेल न्यायालयाने या दोघांचेही अटकपूर्व जामीन फेटाळले होते. शेवटी काळोखे यांच्या हत्येच्या 23 व्या दिवशी भरत भगत हे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. भगत हाताला लागल्याने या हत्येमागील अधिकचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0