देवदर्शनासाठी जात असताना भीषण अपघात ! पनवेल येथील 5 जणांचा मृत्यू

19 Jan 2026 17:15:55
 Panvel
 
पनवेल । पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळजवळ देवडी पाटी परिसरात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
 
ही दुर्घटना शनिवारी (17 जानेवारी) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. पनवेलहून अक्कलकोटकडे जात असलेली एर्टीगा कार मोहोळजवळ आली असता वाहनावरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली आणि भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त कारमध्ये एकूण सहा प्रवासी (तीन पुरुष व तीन महिला) होते. हे सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
 
या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिला ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर 7, पनवेल, जि. रायगड) यांना तात्काळ उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांची नावे
माला रवी साळवे (वय 40, रा.पंचशील नगर झोपडपट्टी, न्यू पनवेल), अर्चना तुकाराम भंडारे (वय 47, रा. खांदा कॉलनी, पनवेल), विशाल नरेंद्र भोसले (वय 41, रा. रेल्वे कॉलनी, पनवेल स्टेशनजवळ), अमर पाटील (रा. खारघर) आणि आनंद माळी अशी नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0