शिवसेना-भाजप युतीसाठी आंबेपूर गट ठरतोय कळीचा मुद्दा , जिल्हा परिषदेसाठी युती होणार की फिस्कटणार?

19 Jan 2026 19:56:24
 alibag
 
अलिबाग । जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी युती करण्याबाबत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरु आहेत. मात्र अलिबाग तालुक्यातील आंबेपूर (कुर्डूस) मतदारसंघ दोघांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. या गटासाठी शिवसेना आणि भाजप दोघेही आग्रही आहेत.
 
त्यामुळे तो भाजपकडे जातो की शिवसेनेकडे? की युतीच फिस्कटते, हे लवकरच स्पष्ट होईल. आंबेपूर (कुर्डूस) जि.प.च्या कुर्डूस गटातून गेल्या निवडणुकीत शेकापकडून चित्रा पाटील या निवडून गेल्या होत्या. त्याला आता जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. चित्रा पाटील आता शेकाप सोडून भाजपसाठी काम करत आहेत. तर याच मतदारसंघात गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी बस्तान बसवले आहे.
 
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चांगले मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे यावेळी राजा केणी यांची पत्नी रसिका केणी या आंबेपूरमधून (कुर्डूस) निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी एकाच जागेसाठी दावा केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत शिवसेने-भाजप अशी खरोखरच युती करायची असेल तर दोघांपैकी एकाला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार आहे.
 
याबाबत शनिवारी या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, यात अलिबाग मुरुडमधील भाजपने तीन जागांची मागणी केल्याचे समजते. यात आंबेपूर (कुर्डूस) चादेखील समावेश आहे. ‘आमची विनींग सीट आहे’ असे भाजपचे म्हणणे आहे. शिवसेनेने शहापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला आहे. मात्र आंबेपूर (कुर्डूस) मधून निवडणूक लढण्यास राजा केणी ठाम असल्याचे समजते. गेल्या वीस वर्षांची आमची तपस्या आहे.
 
मागच्या सात वर्षांत आम्ही लोकांची प्रचंड कामे केलेली आहेत. त्यामुळे काही झाले तर हा मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका सेनेची असल्याचे कळते. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये आंबेपूर (कुर्डूस) गटात असलेली रस्सीखेच पाहता, हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0