जिल्हा परिषद निवडणुकीला मुदतवाढ! 16 फेबु्रवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

13 Jan 2026 17:34:24
 new delhi
 
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
 
निवडणुका दोन आठवड्याने आणखी पुढे गेल्याने इच्छुक उमेदवारांना आणखी काही दिवस निवडणुकीसाठी वाट पहावी लागणार आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या भरवशावर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार सुरु होता.
 
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. यानंतर निवडणूक आयोगाने नगरपालिका, त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका घेतल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, असा अंदाज असतानाच, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढीची मागणी केली.
 
राज्यातील जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या, असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला होता. यावर सोमवारी (12 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
इच्छुकांना फेफरं येण्याची वेळ..?
जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार अक्षरशः गुडघ्यावर आले आहेत. कारण जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपल्यापासून मतदारांचे लाड पुरवता पुरवता त्यांच्या नाकी नऊ आले आहेत. पार्ट्या, पर्यटन, देवदर्शन, गावातील छोट्या मोठ्या देणग्या, स्पर्धा, कोणालाच नाही म्हणायची हिंमत होत नाही; परिणामी उसणवारी करुन हे लाड पुरवले जात आहेत.
 
31 जानेवारीपर्यंत निवडणूका होतीलच, म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते; मात्र पुन्हा एकदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या इच्छुकांवर फेफरं येण्याची वेळ आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0