अलिबाग । अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शेकापच्या नगरसेवक अॅड.मानसी म्हात्रे यांची निवड करण्यात आली. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी ही निवड जाहीर केली. म्हात्रे यांच्याविरोधात भाजपचे अॅड.अंकित बंगेरा यांनी अर्ज दाखल केला होता. सोमवारी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदासाठी शेकापच्या अॅड.मानसी म्हात्रे आणि भाजपच्या अॅड.अंकित बंगेरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदानात शेकापच्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळाले. अॅड.मानसी म्हात्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले दरम्यान, अलिबाग नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना ठाकरे गटाचे संदीप पालकर यांची निवड झाली आहे. तर शेकापचे प्रदीप नाईक आणि जमाल सय्यद यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेत घेण्यात आले आहे.