म्हसळा । उपचारांमध्ये गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय अलिबाग (रायगड) येथील तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
म्हसळा तालुक्यातील घुम येथील रहिवासी गवांग दिनेश गायकर (वय 14 वर्षे) याला एप्रिल 2025 मध्ये ‘केसतोड’चा फोड व ताप आल्याने त्याच्या वडिलांनी प्रथम ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
मात्र, मृत मुलाचे वडील दिनेश सखाराम गायकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर आवश्यक ते उपचार केले नाहीत तसेच त्याला तातडीने रुग्णालयात भरती करून घेण्यास नकार दिला. उपचाराअभावी मुलाची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुन्हा ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे आणण्यात आले. मात्र, 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर सुरुवातीला म्हसळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय अलिबागरायगड येथील तज्ज्ञ समितीकडे सखोल चौकशी सोपविण्यात आली. समितीने सादर केलेल्या अहवालात माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अभिषेक रापते आणि डॉ. नितिश सावंत यांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे तसेच मृत मुलाचे वडील दिनेश सखाराम गायकर यांच्या तक्रारीवरून, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 106(1) व 3(5) अन्वये डॉ. अभिषेक रापते आणि डॉ. नितिश सावंत यांच्याविरोधात 30 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.