खोपोली घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न... संवेदनशील घटनेचे राजकारण नको-नितीन सावंत

By Raigad Times    01-Jan-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत । खोपोली येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी ठाम मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केली. तसेच या घटनेला जाणीवपूर्वक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असून आम्ही कोणत्याही आरोपींच्या पाठीशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी व खासदार सुनील तटकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले. दरम्यान, कर्जत येथे खासदार तटकरे यांच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला नितीन सावंत उपस्थित होते.
 
यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत असल्याने यासंदर्भात शिवालय कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी सावंत यांनी आमदार थोरवे यांचे नाव न घेता टीका करत, सत्तेत आल्यानंतर खोटे गुन्हे दाखल करून राजकीय कार्यकर्त्यांना बदनाम करण्याची परंपरा सुरू असल्याचा आरोप केला. बाबू घारे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा खुनाचा गुन्हा व त्यानंतरची निर्दोष मुक्तता याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
 
आगामी निवडणुका कर्जत परिवर्तन विकास आघाडीतून एकत्र लढणार असल्याचे सांगत, कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचे समर्थन कधीही करणार नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करत दुःखी कुटुंबाला आधार देण्याचे आणि अशा संवेदनशील घटनेचे राजकारण करू नये, असे मत व्यक्त केले.