उरण ओएनजीसीमध्ये भीषण स्फोट! आगीचे तांडव; नागाव परिसरातील घरांना हादरे, नागरिकांमध्ये घबराट

09 Sep 2025 13:14:39
 uran
 
उरण । उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात सोमवारी (8 सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले, तर नागावसह आसपासच्या वस्त्यांमध्ये घरांच्या काचा फुटल्या व नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
 
सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गॅस पाईपलाईन गरम झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसर दणाणून गेला. भीषण ज्वाळा आणि उठणारा काळा धूर पाहून स्थानिक नागरिकांत भितीचे वातावरण पसरले. काही वेळासाठी परिसरात मोठ्या आपत्तीची भीती निर्माण झाली होती.
 
घटनास्थळी ओएनजीसीचे अग्निशमन पथक आणि संकट व्यवस्थापन टीम तात्काळ दाखल झाली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला असून गॅसपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
 
दरम्यान, वारंवार घडणार्‍या गॅसगळती, स्फोट आणि आगीच्या घटनांमुळे उरण व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करुन सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. तात्काळ कारवाईमुळे मोठी आपत्ती टळली असली तरी नागरिकांच्या मनात भितीचे सावट कायम आहे. प्रशासन आणि कंपनीकडून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0