अलिबाग । रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती न करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहिल्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी याबाबत पुनरुच्चार करून महायुतीतील राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीमुळे महायुतीतून जिल्ह्यात निवडणुका लढवण्यासाठी तटकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास शिवसेनेचे तिन्ही आमदार विरोधात असल्याचे महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे. “आम्ही वरिष्ठ नेतृत्वाला आमची भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होणार नाही,“ असेही ते म्हणाले. दरम्यान, महायुतीत भाजपसोबत मैत्री कायम राहील का? याविषयीही उत्सुकता आहे. यासंदर्भात बोलताना दळवी म्हणाले, “भाजपसोबत युती झाली तर ठीक, पण अन्यथा आम्ही एकला चलो रेच्या भूमिकेतूनच निवडणुका लढवू.” यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे ताकद दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या महायुतीचे राजकारण वेगवेगळ्या स्तरांवर सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शिवसेनेची राष्ट्रवादीविरोधातील भूमिका या प्रयत्नांना धक्का देणारी ठरत आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेची वाढती ताकद, विकासाच्या मुद्द्यांवर घेतलेली आक्रमक भूमिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पकड यामुळे शिवसेना स्वतंत्र निवडणुकीच्या तयारीकडे झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे. महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांतील महायुतीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. युती झाली नाही तर शिवसेना-भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा गट उभा करणार का, की स्वतंत्रच लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.