माणगाव । भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहात 25 सप्टेंबर 1930 रोजी प्राणाची आहुती देणारे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या 95 व्या स्मृतिदिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रम शाळा, माणगाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहून हुतात्म्याला श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमात वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या शौर्य, त्याग व बलिदानाची माहिती सांगितली आणि उपस्थितांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाला जिल्हा सचिव मनोज कामत, मुख्याध्यापक उत्तम पाटील, उमेश जाधव, संजय कोळी, चंद्रकांत पवार, हरिश्चंद्र मांडवकर, राम कोळी तसेच म्हसळा, माणगांव आणि रोहा येथील समाजबांधव उपस्थित होते.