कर्जत । कर्जत विधानसभा मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2024 मध्ये झालेल्या कर्जत विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी विजय मिळविला होता.
काही हजार मतांनी पराभूत झाल्यानंतर सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून थोरवे यांच्या विजयाला आव्हान दिले होते. या याचिकेत थोरवे यांनी मतदारांना भडकावणे, धमकावणे तसेच सुधाकर घारे नावाचा डमी उमेदवार उभा करून आपला विजय हिरावून घेतल्याचा आरोप केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.
अखेर 24 सप्टेंबर रोजी न्यायालयाने महेंद्र थोरवे यांच्या बाजूने निर्णय देत घारे यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, या निर्णयानंतर सुधाकर घारे आक्रमक झाले असून त्यांनी अवघ्या तिसर्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. “सत्याच्या बाजूचा विजय उशिरा होईल पण होईलच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयात घारे यांच्याकडून अॅड. आरिफ बुकवाला, अॅड.महेक बुकवाला व अॅड.पूजा थोरात यांनी बाजू मांडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात कोणते नामांकित वकील त्यांची बाजू मांडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.