रायगडला आज ऑरेंज अलर्ट , अतिवृष्टीमुळे कोकण अलर्ट मोडवर

29 Sep 2025 13:37:30
Alibag
 
अलिबाग । कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यासह कोकणातील जिल्ह्यांतील अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांच्यासह महानगरपालिका आयुक्त दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. गेल्या 24 तासांत सरासरी 80 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली असून नद्यांची पातळी वाढली असली तरी ती धोक्याच्या पातळीखाली आहे, असे अधिकार्‍यांनी कळवले.
 
ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. बदलापूरमध्ये शनिवारी एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झाल्याची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही रात्रीपर्यंत रेड अलर्ट दिला असल्याने प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
 
सर्वच आपत्कालीन यंत्रणांनी अलर्ट राहून आपले फोन 24×7 चालू ठेवावेत, कोणाचेही फोन आल्यास त्यांना उत्तर द्यावे. वीज महामंडळाबाबत फोन न घेण्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांनी या सूचनेचे पालन कटाक्षाने करावे, असे सांगितले.
प्रशासनाला स्पष्ट सूचना
* पावसाचे पाणी घरात शिरण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था करावी.
* पालिकांच्या शाळांमध्ये राहण्याची, जेवण व पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
* आपत्कालीन सेवांचे फोन 24×7 सुरु रहावेत आणि नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद द्यावा.
* धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात व धरणांची पाणी पातळी लक्षात ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावे.
* वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांना सज्ज राहण्याचे आदेश.
* दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील गावांना स्थलांतरित करण्याचे निर्देश
Powered By Sangraha 9.0