सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपर्यंत खेमवाडी-ताडगाव या गावाला स्वतःचे समाजमंदिर नव्हते. जे होते ते खूप लहान असल्याने गावातील लोकांना एकत्र येण्यासाठी कोणतीच हक्काची जागा नव्हती. यामुळे नवरात्रोत्सव, पूजा तसेच सार्वजनिक कार्यक्रम व बैठक घेण्यासाठी तरुणांनी प्रचंड कसरत करावी लागत असे. या परिस्थितीचा विचार करत खेमजाई नवतरुण मित्र मंडळाच्या पदाधिकार्यांनी गावाचे जेष्ठ व सर्वसामान्यांकरिता आदरणीय व्यक्ती असलेल्या भगवान धोंडू खताळ व त्यांच्या पत्नी साखरी भगवान खताळ यांच्या निधनानंतर त्यांचे रहाते घर मंडळासाठी द्यावे, अशी विनंती वारसांना केली.
लागलीच त्यांचे कायदेशीर वारस सुरेश झिमा झोरे, आकाश हरिश्चंद्र झोरे, अविनाश हरिश्चंद्र झोरे, अक्षय हरिश्चंद्र झोरे आणि आदित्य हरिश्चंद्र झोरे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता मोठ्या मनाने घर समाजसेवेकरिता दान केले. या समाजोपयोगी योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेमजाई नवतरून मित्र मंडळ व ग्रामस्थांनी त्यांच्या दिलेल्या या अनमोल योगदानाबद्दल आभार मानले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष कैलास खताळ, खजिनदार बाळासाहेब धायगुडे, सचिव मंगेश खताळ, उपसचिव भगवान झोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनंत धायगुडे, उमेश खाताळ व मंडळाचे इतर सदस्यांनी या कामात मोलाची भूमिका बजावली. “आजकालच्या स्वार्थी जगात कोणी कोणाला पाणीही फुकट देत नाही. मात्र आपल्या पूर्वजांचे घर समाजसेवेसाठी वापरण्यासाठी देणे हा खरा आदर्श आहे. समाजातील तरुणांनी हे उदाहरण आपल्या जीवनात अंमलात आणले पाहिजे.” असे खेमजाई नवतरुण मित्रमंडळाचे खजिनदार बाळासाहेब धायगुडे यांनी म्हटले आहे.