महाड । रायगड किल्ला रोपवेवर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य कसे करावे याचा प्रत्यक्ष सराव करण्यासाठी दोरीद्वारे बचावाचा थरारक मॉक ड्रिल गुरुवारी सकाळी पार पडला. या सरावात विविध विभागांच्या यंत्रणांचा संयुक्त सहभाग होता.
बचाव सरावाद्वारे या विविध बचाव यंत्रणांच्या समन्वय तपासण्यात आला. या सरावावेळी एनडीआरएफ 5 बटालियन पुणेचे सहाय्यक कमांडंट निखिल मुद्होळकर, निरीक्षक अंकित कुमार, नितीन सोकाशी, महाड उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे, नायब तहसीलदार आर. निकम, रायगड रोपवे प्राधिकरणाचे एस. भालेराव तसेच रायगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख उपस्थित होते.
या मॉक ड्रिलमध्ये एकूण 93 जवान व कर्मचारी सहभागी झाले होते त्यामध्ये एनडीआरएफ पथक : 27, अग्निशमन दल : 15, रायगड रेस्क्यू टीम : 30, रायगड पोलीस : 10,आरोग्य विभाग : 6 याशिवाय 2 रुग्णवाहिका आणि 1 अग्निशमन वाहन सरावासाठी तैनात करण्यात आले होते. या सरावामुळे प्रत्यक्ष दुर्घटना घडल्यास विविध यंत्रणा तत्परतेने व समन्वयाने काम करण्यास सज्ज असल्याचे दिसून आले.