पनवेल । पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या स्मार्ट वर्क, सुयोग्य व्यवस्थापन व उत्तम कामगिरीला मोठी दाद मिळाली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना आज सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.
खारपाडा टोल नाका ते वावंजे, धोदानी, शिरवली त्याचबरोबर खालापूर तालुक्याची सीमा असा मोठा भाग पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो. नवनवीन गृहनिर्माण संकुल या परिसरात झालेले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भाग या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. त्यामुळे सहाजिकच येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी तालुका पोलिसांवर आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावण्यात आले.
या पोलीस ठाण्याची इमारतही प्रशस्त आहे. त्याचबरोबर साफसफाई आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. पासपोर्ट, बारानिशी, वायरलेस, स्टेशन डायरी आदी विभागासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. महिला व पुरुष आरोपीसाठी कोठडीची सुविधा आहे. स्वच्छतागृह आहे. सर्व खोल्यांमध्ये अद्यावत फर्निचर, पिण्याचे पाणी, स्वच्छसूर्यप्रकाश सर्व विभागात संगणक, इंटरनेट, वायफाय, कॅमेरे आहेत.
दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी त्याचे अन्वेषण आणि प्रकटीकरणाचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यात तालुका पोलिसांना बर्यापैकी यश मिळाले आहे. चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा, आद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, कामकाजातील तत्परता, सायबर क्राईम, भौगोलिक परिसर, जनतेचे अभिप्राय, प्रशिक्षित पोलिस दल, पडदे, टेबल, नामफलक, वरिष्ठ अधिकार्यांची अद्यावत माहिती, मुख्य प्रवेशद्वाराजवळ व्हिजिटर रजिस्टर, नागरिकांची सनद व गुणवत्ता धोरणाचा फलक, आपत्कालीन मार्ग, संपर्क क्रमांक, पोलीस ठाण्याचा मुख्य फलक, हद्दीचा फलक यांसह 37 निकष पनवेल तालुका पोलिसांनी पूर्ण केले आहे.
त्यानुसार त्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. नवी मुंबईमध्ये सानपाडा पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्याकडे सपुर्द करण्यात आले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह अधिकारी आणि अमलदारांचे अभिनंदन केले आहे.