अलिबाग । ऑनलाईन गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणार्यांचा रायगड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 44 म्यूल बँक खाती गोठवली असून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 19 कोटी 44 लाख 34 हजार 93 रुपये जप्त केले आहेत.
याप्रकरणात दोन मोठ्या बँकांचाही समावेश असल्याचे पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी म्हटले आहे. अलिबाग चेंढरे येथे राहणारे अमित जाधव यांने याबाबतची फिर्याद दिली होती. एम 999 ऑनलाईन गेम्स अॅप, मधूर मार्केट अॅप, लकी स्पिन, यासह अशा 26 विविध गेमिंग अॅपवरुन वारंवार मेसेज येत होते. हे अॅप गुगल स्टोअरवर उपलब्ध असल्यामुळे ते कायदेशीर असावेत, असा समज जाधव यांचा झाला.
वारंवार येणार्या जाहिराती बघून अमित जाधव हा शेवटी लोभाच बळी ठरला. त्याने एम 999, मधूर मार्केट अॅप हे दोन अॅप डाऊनलोड केले. 29 ऑगस्टला सर्वप्रथम दहा हजार रुपये त्याने एम-999 या अॅपच्या वॉलेटमध्ये जमा केले. मात्र त्याला कुठल्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. यादरम्यान, भारतात गेमींग अॅपवर बंदी असल्याचे लक्षात आले आणि त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्याने याबाबतची तक्रार रायगड पोलिसात केली होती. यानंतर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागला. पोलीस निरीक्षक रिजवान नदाफ, सह. पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांच्या पथकाने पाळेमुळे खणायला सुरुवात केली. गुन्ह्याची पाळेमुळे खोदत ते राजस्थानपर्यंत पोहचले. एम-999 अॅपच्या भारमल हनुमान मिना याला अटक करण्यात आली. भारमलने घरातील अन्य सदस्यांच्या नावाने करंट खाती उघडली होती.
या खात्यांचा वापर तो फसवणूक केलेल्या लोकांचे पैसे घेण्यासाठी करत होता. साधारण लाख रुपये कमिशन तो दरदिवशी मिळवत होता. या खात्यातून सुमारे 19 कोटी 44 लाख 34 हजार 93 रुपये जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आणखी पाचजणांचा शोध पोलीस घेत आहेत. या अॅपच्या माध्यमातून काही लहान मुलंदेखील ऑनलाईन जुगार खेळत असल्याचे दिसून आले. परीमॅच गेमिंग अॅपच्या फिर्यादीची आयडीएफसी बँक शाखा भुवनेश्वर, ओरीसा मध्ये 50 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. सदरची रक्कम रमाकांत शाहो यांच्या खात्यात जमा झाली होती.
शाहू हा एक मोबाईल शॉप चालवत असून त्यांच्या खात्यात 1 लाख रुपये होते. या खात्यात गेल्या दोन महिन्यांत 56 कोटी रुपयांचा व्यवव्हार झाल्याचे दिसून आले. सुजाता शाहू ही 55 वर्षीय एक गृहिणी असून तिच्या खात्यात दहा हजार बॅलन्स रक्कम होती. या खात्यात गेल्या दोन महिन्यांत 114 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. तर रणूजा बेहरा हा सामान्य नागरिक असून त्याच्या खात्यात 1 लाख 25 हजार शिल्लक होते.
या खात्यात तब्बल 186 कोटी रुपयांच्या व्यवहार झाल्याचे दिसून आले. सदरची तिन्ही खाती आयडीएफसी बँकेत असून याप्रकरणी बँकेचे अधिकारी आणि काही कर्मचार्यांचाही सहभाग असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणातील परी मॅच अॅपचा तपास एन्फोर्समेंट डायरेक्टरकडून येत असून त्यांच्याकडून आतापर्यंत 55 म्युल खात्यातील 3 हजार कोटी गोठवण्यात आले आहेत. रायगड सायबर सेलने याप्रकरणी संबंधित अॅप्स व बनावट खात्यांचा तपास सुरू केला आहे. या मोहिमेत सहा. पोलीस अजय मोहिते, पोलीस हवालदार झिंजुर्टे, सुचिता पाटील, तुषार घरत, समिर पाटील, राहूल पाटील, श्रेयस गुरव या पथकाने सहभाग घेतला.