पोलादपूर सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेत 44 लाखांचा घोटाळा , माजी चेअरमनविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल

25 Sep 2025 20:25:41
 Poladpur
 
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
 
रायगड जिल्हा सहकार निबंधक कार्यालयाच्या निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानुसार पेण येथील सहकारी संस्था लेखापरीक्षक श्याम प्रभाकर कपोते यांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीमध्ये माजी चेअरमन अशोक हजारे यांनी माणगाव, महाड व पोलादपूर येथील ठेवी आणि कर्ज व्यवहारात दबाव वापरून एकूण 44 लाख 44 हजार 351 रुपये अपहार केले असल्याचा उल्लेख आहे.
 
तत्कालीन चेअरमन अशोक हजारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पतसंस्थेच्या नियमानुसार कर्ज, ठेवी व त्यावरील व्याज यासंदर्भातील सर्व निर्णय संचालक मंडळ व सचिव यांच्या सहमतीने होणे आवश्यक असते.
 
मात्र, फक्त तत्कालीन चेअरमन अशोक हजारे यांनी दबाव वापरून अपहार घडवून आणल्याचा आरोप आहे. तालुक्यातील अनेक पतसंस्था आणि नॉन-बँकिंग संस्था आर्थिक गैरव्यवहारात बुडत आहेत. पोलादपूर सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदार व खातेदारांच्या रकमा बुडवल्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0