कर्जत । कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पराभूत उमेदवार सुधाकर घारे यांनी आ.थोरवेंचा विजय रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निकालानंतर महेंद्र थोरवे यांचा विजय कायम राहिला आहे.
त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे.2024 च्या कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे विजयी ठरले होते. या निवडणुकीत केवळ 5 हजार 700 मतांच्या अल्पाधिक्याने विजय मिळाल्यानंतर पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी याचिका दाखल केली, महेंद्र थोरवे यांनी आपला विजय हिरावण्यासाठी “डमी उमेदवार” उभा करून निवडणूक प्रक्रियेत फेरफार केला असा आरोप करण्यात आला होता.
या याचिकेवर गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेन ही याचिकेच न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे सुधाकर घारे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या पक्षियांच्या जल्लोषावर पाणी फेरले आहे. चार दिवसांपूर्वी सुधाकर घारे यांनी कर्जतमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करून “आपणच कर्जत मतदारांचे एकमेव प्रतिनिधी आहोत” असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य भाषणात पक्षाचे राज्य अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना मताधिक्य असल्याचे जाहीर केले होते.
मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर या विधानाचे वजन कमी झाले आहे. आ. थोरवे यांच्या विरोधातील याचिकाच फेटाळण्यात आल्यानंतर कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद, तालुका पंचायत समित्या, तीन नगरपरिषद, एक नगरपंचायत आणि दोन्ही तालुक्यातील साधारण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा राजकीय प्रभाव दृढ राहणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.