धाटाव । मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांतील गावांचा संपर्क तुटला आहे. सोलापूर, माडा तालुक्यातील लहूगाव व धाराशिव या भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो नागरिक पूरात अडकले आहेत.
या संकटसमयी रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थाच्या सदस्यांनी सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरु केले आहे. या टीममधील तरुण शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी धावून गेले असून त्यांच्या धैर्यपूर्ण कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अतिवृष्टीमुळे बळीराजांना भयंकर फटका बसला असून खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले उभे पीक पावसाने मातीमोल झाले आहे. शेतकरी सरकारच्या मदतीकडे आस लावत आहेत. तर, या पावसामुळे अनेक नद्यांनी रौद्र रुप धारण केले असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी रोह्यातील टीमने खांद्याला खांदा लावून काम केले आहे.
सोलापूर येथील सहकार्यांशी संपर्क साधून आमदार अनिकेत तटकरे यांनीही बचावकार्याला सर्वतोपरी सहकार्य केले. संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात यापूर्वीही रेस्क्यूचे काम उत्तमरित्या पार पडले असून, आता मराठवाड्यातदेखील ही टीम जीवाची बाजी लावत कार्यरत आहे.