कर्जत । कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पहिली घटना खालापूर तालुक्यातील चौक-कर्जत मार्गावर घडली. भरधाव टेम्पोने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात संजय भस्मा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, चौक पोलिसांनी पथक तयार करून शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दुसरी घटना कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथे घडली. रेती भरून निघालेला ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला. या अपघातात चालक संकेत बार्शी (28), रा. हुमगाव याचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.