नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , विमानाच्या टेकऑफला मुहूर्त सापडेना!

23 Sep 2025 18:53:18
Panvel
 
पनवेल । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी अनेक वेळा तारखा जाहीर होऊनही अद्यापही विमान उड्डाणाचा मुहूर्त सापडलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळ सुरू करण्याची डेडलाईन सिडको, अदानी ग्रुप व विमानतळ प्राधिकरणाला दिली होती.
 
मात्र, ही मुदतही पुढे ढकलण्यात आल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाला आणखी विलंब लागणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा 1,160 हेक्टर भूभागावर उभारण्यात येत असून जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधांनी सुसज्ज असे हे विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यावर, दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता या विमानतळात असणार आहे.
 
या विमानतळामुळे विद्यमान छत्रपतीशिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरील ताण कमी होणार असून विशेषतः पुणे, नाशिक, रायगड, कोकण पट्ट्यातील प्रवाशांसाठी हे विमानतळ सोयीचे ठरणार आहे. ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे व पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासालाही याचा मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच विमानतळाची पाहणी करून उर्वरित कामे जास्तीत जास्त मनुष्यबळ लावून पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र वनमंत्री गणेश नाईक यांनी उद्घाटन आता पुढे ढकलले जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्घाटनाला आणखी विलंब होणार असल्याचे दिसत आहे.
सीआयएसएफकडे ताबा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जेव्हा ऑपरेट होईल त्याच्या 45 दिवस अगोदर ताबा सीआयसीएफकडे दिला जाणार आहे. या परिसराची सुरक्षितता तसेच दक्षता घेण्याची जबाबदारी या विभागाकडे असणार आहे. या सर्व गोष्टीमुळे येथून विमान उड्डाण करण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अगोदर नामकरण करा!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. नागरी उड्डाण विभाग, पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय आणि पुन्हा पीएमओ ऑफिस असा हा मोठा प्रवास या प्रस्तावाचा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उद्घाटनाच्या अगोदरच लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0