मेढ्यांच्या झुंजीवर अवैध सट्टा , सुधागडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 75 जण ताब्यात

23 Sep 2025 19:55:53
sudhagad
 
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
 
या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाली पोलिसांनी ही कारवाई केली. गोंदाव गावातील टायगर गोट फार्म या ठिकाणी शेकडो लोकांसमोर मेढ्यांच्या झुंजीवर या सट्टा-जुगार सुरु होता. या कारवाईत पोलिसांनी झुंजीसाठी आणलेले 4 मेढे, 10 लाख 37 हजार रुपयांची रोख रक्कम, 1.27 कोटींच्या किंमतीची वाहने (दुचाकी, चारचाकी व इतर साहित्य), मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा एकूण 1.37 कोटींपेक्षा अधिक किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
 
याप्रकरणी शेख मोहम्मद शोएब, मोहम्मद अमान खान, आर्यन जाधव, सरफराज शेख, शेख फराज, अनुज जगताप, अजरुद्दीन मंसी, समीर सय्यद आदींसह 75 जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोनजण फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या सट्ट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत पाली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई, सरगर, स्थानिक गुन्हे शाखेचा स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला.
 
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ग्रामीण भागात मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणार्‍या सट्ट्याचे वाढते प्रमाण या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, पोलिसांच्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0