नागरिकांना शासकीय सेवा आता मोबाईलवरूनच , ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट नागरी सुविधा’चे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते लोकार्पण

23 Sep 2025 20:54:01
 Alibag
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट नागरी सुविधा’ या नवीन डिजिटल सेवचे लोकार्पण करण्यात आले.
 
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय विभागांतून पुरविण्यात येणार्‍या सेवा, शासकीय योजना, कागदपत्रांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक मार्गदर्शन याबाबत अधिकृत व तत्पर माहिती मोबाईलवरच मिळणार आहे.
 
त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, “या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक परिणामकारक होईल. जिल्हा डिजिटल युगातील ‘स्मार्ट गव्हर्नन्स’कडे एक पाऊल पुढे टाकत आहे.”
 
 
Powered By Sangraha 9.0