नवीन पनवेल । लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून एका नराधमाने सतरा वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. तमन्ना शेख असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव असून, याप्रकरणी तळोजा पोलिसांनी मोहम्मद शहीद मिस्त्री (44, राहणार उल्हासनगर) याला 12 तासांच्या आत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मिस्त्री याचा मुलगा आणि तमन्ना यांचे नाते जुळवण्याचा प्रयत्न कुटुंबियांकडून सुरू होता. मात्र तमन्नाने या लग्नाला नकार दिल्याने दोन्ही कुटुंबांत वाद सुरु झाले. 19 सप्टेंबर रोजी तमन्नाची आई अस्मिनाबीबी मोफिजल शेख (रा. आसावरी गृह संकुल फेस टू, तळोजा) ह्या घरकामासाठी बाहेर गेल्या असताना मोहम्मद मिस्त्री हा घरात शिरला.
त्याने प्रथम तमन्नाच्या डोक्यावर कुकरने वार केला आणि नंतर चाकूने गळ्यावर वार करुन तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि मारेकर्याच्या हालचालींचा मागकाढला. पोलिसांनी सहा पथके तयार करून तांत्रिक तपास सुरू केला. मारेकर्याची चालण्याची लकब ओळखत केवळ 12 तासांच्या आत उल्हासनगरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले.