कामोठेकरांकडून ‘मृत’ रस्त्यांचे श्राद्ध ! सर्वपित्री अमावस्येचे औचित्य साधून नागरिकांचे अनोखे आंदोलन

22 Sep 2025 20:18:32
Panvel
 
पनवेल । कामोठे वसाहतीतील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून अखेर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करण्यासाठी अनोखा मार्ग निवडला. सर्वपित्री अमावस्येचे औचित्य साधून ‘मृत’ रस्त्यांचे श्राद्ध घालून कामोठेकरांनी पनवेल महापालिकेच्या निष्क्रीय कारभाराचा समाचार घेतला.
 
पनवेल महापालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती यासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले. त्यातील केवळ कामोठे वसाहतीसाठीच 10 कोटींची निविदा काढण्यात आली होती. मात्र पहिल्याच पावसात डांबर वाहून जाऊन रस्त्यांवर केवळ रेती व खडीच उरली; परिणामी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
 
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एकता सामाजिक संस्था, शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून आंदोलने करण्यात आली होती. रविवारी एकता सामाजिक संस्थेच्यावतीने सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कामोठे पोलीस ठाण्यासमोर फलक लावून मृत रस्ते व खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले. या ठिकाणी प्रतीकात्मक 25 पैशांचा नैवेद्य ठेवण्यात आला. या आंदोलनात अमोल शितोळे, सचिन त्रिमूखे, प्रशांत कुंभार, अ‍ॅड. समाधान काशीद, अरुण जाधव, त्रिशा घोडे, उमेश गायकवाड, संगीता पवार आदी सहभागी झाले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0