पनवेल । कामोठे परिसरात दोन मुलींच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्ष भगत (वय 19, रा. उसर्ली खुर्द, पनवेल) हा नोकरीनिमित्त कामोठ्यात राहत होता.19 सप्टेंबर रोजी हर्ष आपला मित्र साहिल पाटील सोबत सेक्टर-36, कामोठे येथील ज्यूडिओ शॉपजवळ गेला होता. साहिलला त्याच्या ओळखीतील दोन मुलींच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर त्या दोन मुलींसोबत आलेल्या काही मुलांचा साहिलसोबत वाद झाला.
त्यावेळी हर्षने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण वाद चिघळला आणि त्यातच स्वराज नावाच्या मुलाने चाकू काढून हर्षच्या पाठीवर वार केला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांना त्यांच्या साथीदारांनी तेथून पळ काढायला मदत केली. जखमी अवस्थेत हर्षला साहिलने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हर्ष भगत याने दिलेल्या फिर्यादीवरून स्वराज आणि त्याच्या साथीदारांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.