खोपोली | खोपोली रस्त्यालगत असलेल्या धाकटी पंढरी विठोबा देवस्थानच्या जागेवर सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकार्यांना गुरुवारी (१८ सप्टेंबर) विरोधाचा सामना करावा लागला. मूळ जागा मालक सोनूबाई पालांडे यांचे नातेवाईकांनी जागा आमची असल्याचे सांगत सर्व्हेला मज्जाव केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
देवस्थान कमिटीच्या माहितीनुसार, सदरील जागेवर एका कंपनीने अतिक्रमण केले असून सातबार्यावर देवस्थानाचे नाव स्पष्ट असतानाही काही नातेवाईक जागेवर दावा करत आहेत. त्यामुळे देवस्थान कमिटीने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालय आणि खालापूर पोलिस ठाण्यात कागदपत्रे दाखवत सर्व्हे ला सहकार्य करण्याची मागणी केली आहे.नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी पोलिस बंदोबस्तात सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत.
खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार यांनीही कागदपत्रांची तपासणी करून, "जमीन आपली असल्याचा दावा करणार्यांनी पाच दिवसांत कायदेशीर स्थगिती आणावी,” असा सल्ला दिला आहे. देवस्थान कमिटीचा दावा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंता पाटील यांनी सांगितले, "अनेक ठिकाणी देवस्थानची जागा असून सातबार्यावर देवस्थान व्यतिरिक्त कोणाचाही हक्क नाही.
माणकीवलीतील जागाही देवस्थानची असून काही कंपनीने ही जमीन बेकायदेशीररीत्या हडप केली आहे. वारसांना हक्क नसतानाही काही लोक आपलीच जमीन असल्याचा खोटा दावा करत आहेत, हे चुकीचे आहे. विश्वस्त अॅड. रामदास पाटील यांनी सांगितले, "सदरील जागा १०० वर्षांपूर्वी सोनूबाई पालांडे यांनी देवस्थानला दिवाबत्तीसाठी कायमची दिली होती. २०१०-११ मध्ये सोनूबाई यांनी तहसील कार्यालयात लेखी जबाब देत ही जमीन देवस्थानला कायमस्वरूपी दिल्याचे मान्य केले होते. तरीही काही नातेवाईकांचा अडथळा हा चुकीचा आहे.”