शेतकर्‍यांचे वडाळे तलावाजवळ जलसमाधी आंदोलन

21 Sep 2025 13:03:33
 panvel
 
नवीन पनवेल | मौजे साई येथील १०८ गुंठे जमीन ही त. तलाठी आणि त. मंडळ अधिकारी यांनी बनावट कागदपत्र बनवून आणि बनावट सावकार उभे करून जमीन हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कासारभट येथील भोंडकर कुटुंबीयांसह जलसमाधी आंदोलन १९ सप्टेंबर रोजी पुकारले.
 
यावेळी तहसीलदार, स्थानिक पोलीस यांनी मध्यस्थी करत या जमीन मिळकतीच्या संदर्भातील सर्व अधिकार, अभिलेखाची पडताळणी करण्यात यावी असे मंडळाधिकारी, कर्नाळा यांना पत्राद्वारे कळविले असल्याचे सांगितले. पनवेल तालुयातील कासारभट येथील शेतकर्‍याला न्याय मिळत नसल्याने त्यांनी ८ ऑगस्ट रोजी अपर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी वडाळे तलावाजवळ जलसमाधी आंदोलन करण्याचे ठरवले.
 
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलन पुकारण्यासाठी भोंडकर कुटुंबीय आले असता त्यांना तहसीलदारांसोबत चर्चा करण्यासाठी निरोप आला. यावेळी स्थानिक पोलीस, भोंडकर कुटुंबीय, माजी सरपंच अनिल ढवळे यांच्यासह शेतकरी तहसील कार्यालयात गेले.
 
यावेळी तहसील कार्यालयाकडून मंडळ अधिकारी कर्नाळा यांना या प्रकरणाची पडताळणी करण्यात यावी तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या आदेश यांच्या प्रति प्राप्त करून घेऊन आदेशांच्या अनुषंगाने पुढील कोणती कार्यवाही केली याबाबत माहिती देण्यात यावी आणि याप्रकरणी कसूर झाला आहे का आणि कसे आणि ते कोणाकडून झाले याचा अहवाल तातडीने सादर करावा असे पत्र अपर तहसीलदार, पनवेल जितेंद्र इंगळे यांच्याकडून देण्यात आले आहे.
 
याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि भोंडकर कुटुंबीयांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले आणि तत्कालीन तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0