नवी मुंबई । नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव चिन्मय देगिया असे असून, ते सीवूड्स येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
चिन्मय हे सेक्टर-48 येथील साई महाल गृह निर्माण संस्थेत राहात होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरात ते मृत अवस्थेत आढळून आले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला.
पोलिसांनी प्राथमिक माहिती घेत असताना आत्महत्येचे नेमके कारण मात्र समोर आलेले नाही. याबाबत पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यानंतरच या आत्महत्येमागील कारणांवर प्रकाश पडेल, असे सांगण्यात आले आहे.