पितृ‘पक्षी’ धोक्यात ? शहरांतील कावळे गेले कुठे?

18 Sep 2025 20:24:39
 uran
 
उरण । सध्या पितृपक्ष सुरु आहे. या काळात अनेक ठिकाणी पूर्वजांचे स्मरण करुन त्यांना नैवैद्य अर्पण केले जाते. घरावर किंवा टेरेसवर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यावेळी सर्वांना आठवण येते ती कावळ्याची; कारण पूर्वजांच्या नावाने ठेवलेले अन्न ग्रहण करण्यासाठी कावळ्याला बोलावले जाते.
 
‘काव, काव, ये ये’ असे म्हटलेकी, कावळा येतो आणि ठेवलेले अन्न ग्रहण करतो असा समज आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये चिमणीप्रमाणोच कावळ्यांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे.अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी भाद्रपद महिन्याताल कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला हिंदू धर्मातील महत्त्वाचा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष 7 ते 21 सप्टेंबर या कालावधीत आहे.
 
या काळात कावळ्याला महत्त्व आहे. परंतु उरण परिसरातील कावळ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळेच हा विधी करताना गायीला किंवा इतर पशु पक्ष्यांना घास भरवावा लागत आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय असे विधी केले जातात. पितृपक्षात केलेल्या तर्पणामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कायम सुख-शांती नांदते, असे मानले जाते. पूर्वजांच्या मृत्यूची जी तिथी असेल त्या तिथीला पितृपक्षात श्राद्ध केले जाते.
 
याला महालय असे म्हणतात. ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसते किंवा त्या तिथीला महालय करणे शक्य होत नाही त्यांचा महालय सर्वपित्री अमावस्येला (भाद्रपद अमावस्या) केला जातो. पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या इतर दिवसाप्रमाणे या काळातही खरेदी-विक्रीचे व्यवहार कराण्यासाठी अन्य कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही. या दिवसांमध्ये पिंडदान आणि तिलांजली अर्पण करुन पितरांना संतुष्ट केले जाते.
 
पितृपक्षात पूर्वज विशेष पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे. पितृपक्षाचे 16 दिवस अयोग्य मानले जातात. ऐरवी कावळ्याला कधीही जवळ न करणारेदेखील पितृपक्षात काव...काव....करत असतात. यंदा मात्र पितृपक्ष अर्ध्या अधिक संपला, तरी काव काव फारशी कानावर येत नसल्याचे दिसते. आपल्या पूर्वजांसाठी ठेवलेला नैवेद्य किंवा पिंडाला स्पर्श करण्यासाठीदेखील कावळा दिसत नसल्याने यंदा कावळे गेले कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पितृपक्षात कावळ्याला अन्न देणे हे शुभ मानले जाते, जे पितरांना तृप्त करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते, अशी धारणा आहे. ग्रामीण भागात कावळे दिसत असले, तरी शहरी भागातील त्यांची संख्या कमी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्यावरणात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे अनेक वन्यजीव पशूपक्षी नष्ट झाले असून येर्‍या काळात अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबद्दल प्राणीप्रेमी व पर्यावरणप्रेमीनी चिंता व्यक्त केली आहे.
 
उंदीर तसेच इतर लहान जीव मारण्यासाठी विषारी रसायनांचामोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे. मेलेला उंदीर किंवा इतर लहान प्राणी उघड्यावर किंवा कचर्‍याच्या ठिकाणी टाकला जातो. मेलेले उंदीर व इतर लहान प्राणी हे कावळे खातात. उंदीर व लहान प्राण्यांना विषटाकून मारण्यात येते, हे विष त्यांच्या शरीरात तसेच राहते व हे उंदीर व लहान प्राणी हे कावळे खात असल्यामुळे कावळ्यांचा विषारी रसायनामुळे मृत्यू होतो. या बाबीवर वेळीच लक्ष देऊन घातक रसायनांवर बंदी घातली पाहिजे. - राजू मुंबईकर, संस्थापक अध्यक्ष, केअर ऑफ नेचर संस्था, पक्षीमित्र
Powered By Sangraha 9.0