श्रीवर्धन नानवली किनार्‍यावर तब्बल 59 लाखांचा चरस जप्त , दिघी सागरी पोलिसांची मोठी कारवाई

17 Sep 2025 20:39:58
 shreewardhan
 
श्रीवर्धन । तालुक्यातील नानवली समुद्र किनार्‍यावर तब्बल 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला असून दिघी सागरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ मासेमारीसाठी गेले असता किनार्‍यावर एक संशयास्पद गोणी आढळून आली.
 
ग्रामस्थांनी तातडीने सरपंच विपुल गोरीवले यांच्याशी संपर्क साधला. गोरीवले यांनी तत्काळ दिघी सागरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गोणी उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल 11 किलो 966 ग्रॅम चरस असल्याचे समोर आले. पोलिसांनी ही गोणी जप्त करून दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या चरसचे बाजारमूल्य तब्बल 59 लाख 83 हजार रुपये इतके असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
 
प्राथमिक तपासात हा चरस परदेशातून तस्करी करुन आणून समुद्रकिनार्‍यावर फेकून दिला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. अलिबाग, मुरुड, रोहा आणि महाड तालुक्यात याआधीच तस्करीविरोधात मोहीम राबविण्यात आली आहे. याच मोहिमेमुळे तस्कर पोलिसांच्या भीतीपोटी साठा किनार्‍यावर टाकून पळ काढत असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
ऑगस्ट महिन्यातही काशिद किनार्‍यावर तब्बल 11 किलो चरस आढळला होता. आता पुन्हा एकदा दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर चरस हाती लागल्याने तपास यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्याकडे पुढील तपास आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0