रोहा आगाराची एस.टी. उलटली , चार विद्यार्थी व चार प्रवासी किरकोळ जखमी

16 Sep 2025 18:50:14
 dhawat
 
धाटाव । रोहा आगारातील रोहा, कोलाड, भाले मार्गावरील एस.टी. बस सोमवार, 15 सप्टेंबर रोजी पलटी झाली. या अपघातात चार विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
 
एम.एच 20 बी.एल. 3866 ही एस.टी. बस सकाळी साडेअकराच्या सुमारास भाले येथून जावटे मार्गावर प्रवास करत असताना समोरून येणार्‍या वाहनाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे हुलकावणी दिल्यामुळे बस चालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र बसचा तोल जाऊन ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली.
 
बसमधून पहूर गावातील चार विद्यार्थी भाले हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जात होते. त्यांच्यासोबत एक शिक्षक व इतर तीन प्रवासीहोते. एकूण आठ प्रवासी जखमी झाले असून सर्वांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
 
अपघातानंतर भाले गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य केले. सुदैवाने अपघातात गंभीर जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे रस्त्यांवरील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0