मुंबई । महाराष्ट्रातील सर्वात मोठा नोकरी घोटाळा उघडकीस आला असून थेट मंत्रालयात मुलाखत घेऊन बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी लॉरेन्स हेन्री याला मुंबईतून अटक केली असून सहाजण अद्याप फरार आहेत.
बेरोजगार तरुणांना महसूल व वन विभागात क्लर्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत या टोळीने 9 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर मंत्रालयात पाचव्या मजल्यावर मुलाखती घेतल्या गेल्या, सचिव दर्जाच्या अधिकार्याची बनावट ओळख देत सरकारी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या घेऊन तरुणांचा विश्वास संपादन करण्यात आला. राहुल तायडे आणि अमित वानखेडे या दोन तरुणांसह शेकडो जणांची या टोळीने फसवणूक केली आहे.
दोन आठवड्यात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यांनी लाखो रुपये उकळले. मंत्रालयातील काही कर्मचार्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उदापूरे, विजय पाटणकर, नितीन साठे, सचिन डोळस आणि बाबर नावाचा शिपाई हे सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.