भाजपचे पराग मेहता विजयी , भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

11 Sep 2025 12:31:36
pali
पाली । अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बुधवारी (10 सप्टेंबर) भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 15 पैकी 9 मते मिळाली, शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांना 5 मते मिळाली. एक मत तटस्थ राहिले.
 
बुधवारी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. यावेळी पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पाली नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला तिरंगी लढत होणार असे चित्र होते. शिवसेनेच्या कल्याणी संदीप दबके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे आणि भाजपचे पराग मेहता अशी समीकरणे होती.
 
 
pali
 
मात्र निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत पराग मेहता यांना पाठिंबा जाहीर केला आणि दोन दिवसांत ‘घोडेबाजार’च्या चर्चेमुळे वातावरण चांगलेच तापले होते. निवडणुकीच्या निकालानंतर अखेर या चर्चेवर पडदा पडला असून भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनी मिळून राज्यांत त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला धूळ चारली आहे. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत मोठा जल्लोष साजरा केला.
 
“पराग मेहता नगराध्यक्ष झाल्याच्या” घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले. यावेळी भाजपचे खासदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, तसेच ललित ठोंबरे, सुशील शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणुकीच्या आदल्या दोन दिवस आधी झालेल्या राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरल्या.
 
pali
 
पराग मेहता यांच्या विजयाने भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मोठा राजकीय टप्पा गाठता आला असून पाली नगरपंचायतीतील आगामी राजकारणाची दिशा यानंतर ठरणार आहे. दरम्यान, पाली नगरपंचायतीतील सदस्यत्व रद्द होणे, राजीनामे आणि वारंवार होणार्‍या उलथापालथीमुळे पालीचा विकास खुंटलेला आहे. या निवडणुकीनंतर तरी नव्या कारभार्‍यांनी पाली नगरपंचायतीचा कारभार नीट चालवावा, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
पराग मेहता हे तरुण तडफदार व विकासदृष्टी असलेले दमदार नेतृत्व पालीचा सर्वांगीण शाश्वत विकास गतीने साधला जाईल.त्यांच्या पाठीशी खासदार म्हणून मी व सुनील तटकरेदेखील आहेत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना, रिपाइं महायुतीचे सरकार केंद्रात व राज्यात आहे. याचा पुरेपूर फायदा पाली नगरपंचायतीच्या सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी नगराध्यक्ष व सहकारी काम करतील.- खासदार धैर्यशील पाटील
भाजप, राष्ट्रवादीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. मिळालेल्या या संधीचे सोने करेन. पालीचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, मला 10 चेंडूत 100 धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यात मी यशस्वी ठरेन. - पराग मेहता, पाली नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष
Powered By Sangraha 9.0