पालीमध्ये महायुतीतील दोन भिडू आमने-सामने ! पाली नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक

10 Sep 2025 19:46:21
pali 
 
सुधागड | पाली नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज (बुधवारी १० सप्टेंबर) होत आहे. राज्यात महायुतीतील दोन मित्रपक्ष भाजप व शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवारएकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीतील आणखी एक भिडू असलेल्या राष्ट्रवादीने आपले वजन भाजपच्या पारड्यात टाकल्याचे चित्र आहे.
 
निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक ‘नॉटरिचेबल’ झाले असून निवडणुकीत घोडेबाजार झाल्याची चर्चा रंगली आहे.पाली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून नगरपंचायतीमध्ये असंख्य राजकीय उलथापालथ होत असून, अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे.
 
नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल, नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द होणे, तसेच पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा आदी घडामोडी हे पालीच्या विकासकामांसाठी घातक ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे आज (१० सप्टेंबर) नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
 
निवडणुकीच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला व भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दर्शविला. सुधागड तालुका अध्यक्ष संजय शेवाळे यांनीदेखील पक्षाच्यावतीने भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके व भाजपचे पराग मेहता हे दोनच उमेदवार असून महायुतीमध्येच आता नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होताना दिसत आहे.
 
असे म्हटले जाते की, निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपचे दोन नगरसेवक अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे भाजपाला निश्चित आकडा जमवताना रस्सीखेच करावी लागणार आहे. कोणत्या पक्षाचा नगरसेवक कुठे जाईल? आणि काय करतोय? याकडे पक्षश्रेष्ठी व पदाधिकारी नेते यांचे लक्ष आहे. शिवाय मतदानाच्या दिवशी पक्षादेश पाळला जाईल की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. एकंदरीत पालीच्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? कोण असेल पुढचा नगराध्यक्ष? या चर्चेला उधाण आले आहे.
आकडेवारी
पाली नगरपंचायतीत एकूण १७ सदस्य असून २ सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले आहे. सध्याची आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५ नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) ५ नगरसेवक, भाजप ४ नगरसेवक आणि शेकाप १ नगरसेवक अशी आहे.
महायुतीतच थेट लढत
राज्य व देश पातळीवर भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अशी महायुती एकत्र असली तरी पाली नगरपंचायतीत मात्र एकी साधली नसल्याने भाजप व शिवसेना शिंदे गट या दोघांत थेट लढत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0