अलिबाग | अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे उखडून खड्डेमय झाला असून प्रवास जीवघेणा ठरत आहे. तब्बल २२ किमी लांबीच्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे, उंचवटे, वाकडी-तिकडी वळणं यामुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण तसेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदन दिले. पिंपळभाट, राऊतवाडी, वाडगांव फाटा, खंडाळा, तळवली, तीनवीरा गेस्ट हाऊस, जोशी वडेवाले, चरी फाटा, पेझारी पोलीस चौकी, पेझारी, पोयनाड, पांडवादेवी हे प्रमुख भाग अत्यंत खराब स्थितीत असल्याचेनिवेदनात नमूद आहे.
निवेदन मिळाल्यानंतर प्रशासनाने उद्यापासून खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, काम त्वरित सुरू न झाल्यास अलिबाग-पेण रस्ता संघर्ष समितीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अॅड. प्रवीण ठाकूर, अॅड. मानसी म्हात्रे, निलेश पाटील, दिलीप जोग, सुरेश घरत, शैलेश चव्हाण, सचिन राऊळ, आकाश राणे, निखिल मयेकर, विक्रांत वार्डे, विकास पिंपळे, अॅड. रत्नाकर पाटील, आमोद मुंडे, प्रमोद घासे, चेतन कवळे, योगेश पाटील, राजू विश्वकर्मा, संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, सरकार व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जनतेची सहनशक्ती संपत चालली असून, तातडीने रस्ता दुरुस्त न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल. दरम्यान, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मी स्वतः याकडे लक्ष घालतो, असे आश्वासन या समितीला दिले.