संकट दूर करुन धंद्यात बरकत दे... ,नारळीपौर्णिमेनिमित्त दर्याला नारळ अर्पण करत दर्याराजाचे साकडे

09 Aug 2025 13:16:57
 uran
 
उरण | आम्हावरील संकट दूर कर, धंद्यात बरकत दे, असे साकडे घालत शुक्रवारी (८ ऑगस्ट) कोळीबांधवांनी नारळीपौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केला. खोल समुद्रात जाऊन सागराला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करतानाच दर्याराजाने समुद्राची मनोभावे पूजा केली.
 
नारळी पौर्णिमा हा कोळीबांधवांचा महत्वाचा सण मानला जातो. कोळी बांधवांचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी आहे. वर्षभर मासेमारी करूनच कोळीबांधव आपला व कुटुंबाचा गुजारा करतो. जून आणि जुलै असे दोन महिने मासेमारीसाठी बंदीचा काळ संपल्यानंतर मच्छिमारी करण्यासाठी खोल समुद्रात वादळवारा पावसात कोळीबांधव जात असतात. समुद्र खवळलेला असतो. नारळीपौर्णिमेला नारळ अर्पण करत, समुद्राला शांत राहण्याची प्रार्थना कोळीबांधव करतात.
 
uran
 
त्यानंतर मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होते. कोळी बांधवांवर कोणतेही अरिष्ट येऊ नये यासाठी आणि समुद्राचे कोळी बांधवांवर असलेले उपकार त्यामुळे समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्हाभरातील समुद्रकिनार्‍यांवर गर्दी झाली होती. कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी वस्त्र परिधान करुन, वाजतगाजत नारळाची मिरवणूक काढत हा सण साजरा केला.
 
उरणमधील गव्हाण, मोरा, करंजा, दिघोडे आदी भागातून कोळी बांधवांकडून समुद्रात नारळ अर्पण करण्यात आले. हा परंपरागत आम्हा कोळी बांधवाचा सण आम्ही दरवर्षी साजरा करतो. आमचा उदरनिर्वाह समुद्रावरच होतोय, हा समुद्र आमच्यासाठी पुजनीय आहे. आम्हा कोळीबांधवावर मासेमारी दरम्यान कोणतेही आरिष्ट येऊ नये, यासाठी समुद्राची पूजा करतो असे, जयवंत कोळी यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0