मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात शहरी भागात प्रभाग रचना व ग्रामीण भागात गट व गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट व गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
ग्रामविकास तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे लिहितात की, प्रभाग रचना करताना या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पुरेपुर पालन होणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निश्चित करताना व त्यांच्या चतुःसीमा ठरवताना नियमामध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.
या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही व कोणत्याही राजकीय दबावाखाली चुकीचे काम होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.