राज ठाकरेंचा वार, पनवेलमध्ये फुटला डान्स बार , मनसैनिकांचा ‘नाईट रायडर्स’वर हल्ला

04 Aug 2025 16:28:52
panvel
 
पनवेल | रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यावरुन चालला, त्या किल्ल्यावरुन या जिल्ह्याला रायगड नाव पडले. असे असताना, महाराष्ट्रात सर्वाधिक डान्स बार रायगड जिल्ह्यातच असावेत, अशी नाराजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही तासांत मनसैनिकांनी पनवेल येथील पहिला डान्सबार फोडला.
 
अचानक घडलेल्या या घटनेमुळे बारमधील ग्राहकांची तारांबळ उडाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (२ ऑगस्ट) शेकाप मेळाव्यानिमित्त पनवेल येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील डान्सबारच्या मुद्यावर भाष्य केले होते. पनवेल परिसरात लेडीज बारची संख्या जास्त आहे. वास्तविक पाहता डान्स बारला बंदी घालण्यात आलेली आहे. माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. तरुण पिढी बरबाद होऊ नये हा या पाठीमागचा उद्देश होता.
 
असे असले तरी सर्व्हिस बार आणि ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास बारमध्ये डान्स चालतो. आजही मोठ्या प्रमाणामध्ये बारबालांवर ग्राहक पैसे उधळतात. स्थानिकांबरोबरच घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात आंबट शौकीन या लेडीज बारमध्ये येतात. कोन परिसरात मुंबई-पुणे महामार्गालगत मोठ्या प्रमाणात बारचे हब आहे. बाहेरच्या अनेक गाड्या या बारसमोर लागतात. नियम आणि अटी पायदळी तुडवून रात्री उशिरापर्यंत ऑर्केस्ट्राच्या नावाने बारबाला ग्राहकांसमोर हिडास आणि अश्लील नृत्य करतात.
 
पुढे खोपोली आणि खालापूरमध्ये काही बार आहेत. परंतु पनवेल परिसरामध्ये सर्वाधिक लेडीज बार आणि अनधिकृतपणे डान्स बार चालवले जातात. मुंबई येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर ‘सावली’ या बारचा परवाना होता. त्यावर मेमध्ये कारवाई झाली. आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीसुद्धा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
हा विषय चर्चिला जात असताना राज ठाकरे यांनी थेट डान्स बारवर शाब्दीक हल्ला केला. हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणार्‍या शिवछत्रपतींची राजधानी असणार्‍या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत. बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत.
 
राज ठाकरे यांनी रायगड आणि पर्यायी पनवेलकरांना आत्मचिंतन करायला लावणारे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री बारा वाजता कोन येथे जाऊन नाईट रायडर्स लेडीज बारची तोडफोड केली. याप्रकरणी बारा मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

panvel
 
शेकापच्या मेळाव्यात मराठीचा अजेंडा!
पनवेल | शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात मराठी अजेंडा दिसून आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत अप्रमित मार्गदर्शन करुन शेकापच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लाल बावट्याचे गोडवे गायले.
 
शेतकरी कामगार पक्षाचा ७८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा हा वर्धापन दिन महत्त्वाचा होता. राज ठाकरे यांनी उपस्थित राहून मराठीच्या मुद्द्यावर भर देत सरकारवर तोफ डागली. जेव्हा भाषा आणि तुमची जमीन तुमच्याकडून हिरावली जाते, तेव्हा तुमचे अस्तित्व संपते. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जमीन घेतली जात आहे.
 
विशेष करून बाहेरचे लोक या ठिकाणी मालक झाले आहेत. भविष्यात रायगड पनवेलमध्ये परप्रांतीय खासदार आमदार आणि नगरसेवक होतील तेव्हा आपले डोळे उघडतील, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. त्यामुळे पक्षीय राजकारण सोडून मराठीच्या मुद्द्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0