गणेशभक्तांचा परतीचा प्रवास होणार सुखकर , महाड आगार सज्ज; पनवेलसह विविध मार्गावर १०० जादा एसटी बसेस

29 Aug 2025 20:53:14
 mahad
 
महाड | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई गुजरात येथून मोठ्या संख्येने चाकरमानी महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात दाखल झाले आहेत. दीड दिवसीय आणि रविवारी पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केल्यानंतर, आता परतीच्या प्रवासाची वेळ जवळ येत असून, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या महाड आगाराने यंदाही विशेष तयारी केली आहे.
 
परतीच्या प्रवासासाठी मुंबई, पनवेल, नालासोपारा, परळ, ठाणे, बोरिवली, उरण, कल्याण, पुणे आदी ठिकाणी जादा एस.टी. गाड्यांची सोय करण्यात आली असल्याने गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला एस.टी. सज्ज झाली आहे. महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड आगारातून तब्बल १०० जादा बसेस धावणार असून, फक्त महाड ते पनवेल मार्गावर ५० ते ६० बसेस सज्ज आहेत.
 
महाड आगार परिसरातच प्रवासी वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहेत याच ठिकाणावरुन बुकींगनंतर या बसेस सुटतील. विशेष म्हणजे, प्रवाशांना ग्रुप बुकींगची सुविधा उपलब्ध असून, अशा गट प्रवाशांसाठी एस.टी. बस थेट त्यांच्या गावातून सोडली जाणार आहे. यामुळे गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. महाड आगारात नुकतेच नवीन स्वच्छतागृह व शौचालय सुरू करण्यात आले असून, प्रवाशांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे.
 
तथापि, चाकरमानी गणेशभक्तांसाठी मोठ्या प्रमाणात गाड्या व चालक गुंतल्यामुळे ग्रामीण भागातील फेर्‍यांवर थोडा फरक पडणार असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण प्रवाशांनी याबाबत सहकार्य करावे, तसेच परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकींग व अन्य सुविधांसाठी रितेश फुलपगारे (महाड आगार प्रमुख) ७७२१०२९९३९, अमोल खाडे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक) ८७९३४६४७०२, उदय हाटे (स्थानक प्रमुख) ९०२१०८४८९३, तुषार हाटे (निरीक्षक) ७०५८७१६९१०, डावरे (कार्यशाळा प्रमुख) ९४२३३८०५६८, चिनके (लिपिक) ७७७००९९९३४ या अधिकारी व कर्मचार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाड आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0