रायगडात ड्रोन वापरास बंदी; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

29 Aug 2025 20:18:30
 alibag
 
अलिबाग | जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रात) पोलीस विभागाची पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
 
पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था तसेच समुद्रालगतचे भाग हे दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील आहेत.पूर्वी देशातील विविध भागात दहशतवादी व विघातक कारवायांसाठी ड्रोनचा वापर झाल्याची उदाहरणे आहेत.रायगडमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत ड्रोन उडवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
ड्रोनद्वारे टेहळणी करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता तसेचचोरी व अन्य गुन्ह्यांसाठी ड्रोनच्या माध्यमातून माहिती संकलनाची शक्यता आणि ड्रोनद्वारे केलेले चित्रिकरण विघातक कृत्यांसाठी वापरले जाण्याचा धोका लक्षात घेता हा आदेश जारी केला आहे. ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करावयाचा असल्यास व्यक्ती, संस्था वा आयोजकांनी ७ दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देवून परवानगी घेणे बंधनकारक राहील.
Powered By Sangraha 9.0