घरपट्टीच्या ओझ्याखाली इर्शाळवाडी; गावकरी जुन्या गावी जाण्याच्या तयारीत!

22 Aug 2025 16:41:43
khopoli
 
खोपोली | तालुक्यातील इर्शाळवाडी दरडग्रस्तांवर आभार कोसळले आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा मृत्यू झाला. सरकारने या वाडीमधील लोकांचे डोंगराच्या पायथ्याशी पुर्नवसन करुन दिले. टुमदार घरं, पाणी, रस्ता, वीजही दिली; मात्र मूळ गाव सुटल्याने दरडग्रस्तांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, चौक ग्रामपंचायतीने आकारलेल्या घरपट्टीची रक्कम बघून फेफरं येण्याची वेळ इथल्या दरडग्रस्तांवर आली आहे.
 
त्यामुळे सध्याच्या घराला कुलूप लावून ग्रामस्थ पुन्हा जुन्या इर्शाळवाडीत राहण्यास जाण्याच्या तयारीत आहेत. १९ जुलै २०२३ रोजी खालापूरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला. मातीत गाडले गेलेले ५७ जणांचे मृतदेह सापडलेच नाही. यानंतर शासनाने पुर्नवसनाच्या नावाखाली घरे बांधून दिली. तिथे वीज बिल हजारांच्या घरात जात आहे, सिलेंडरसाठी महिना हजार रुपये, कडधान्य, तांदूळ, नाचणीसाठी ५ हजार, प्रवासासाठी खर्च अशा ओझ्याखाली इथला दरडग्रस्त दबला जात आहे.
 
नवीन घरांसाठी ५ हजार रुपये घरपट्टी लादली आहे. ती कशी भरायची? रोजगार नाही, सर्वच विकतचे आणावे लागत असल्याने आर्थिक घडी पूर्ण विस्कटली आहे. जुन्या इर्शाळवाडीत ना लाईट बिल, जंगलातून जेवण शिजवण्यासाठी सरपण मिळायचे, ना घरपट्टी, शेत जमिनीतून भात, दळी वरकसमधून नाचणी, वरी मिळत होती. तर मासेमारी व खेकडा, चिंबोरी व परसबागेतून भाजीपाला मिळत असे. दुभदुभत्यासाठी गाई होत्या.
 
khopoli
 
अशा आंनदी जीवनात नियतीने घात केला. संसाराची राखरांगोळी झाली अन् जीवनाची परवड सुरू झाली; मात्र दुःखाचा डोंगर सारुन पुन्हा नव्याने संसार उभा केला जात असताना जीवनाची दशा थांबता थांबत नाही. पक्क्या घरातील खर्च भरुन जीव मेटाकुटीस आला आहे. शासनाने पक्क्या घरात आणले; मात्र आमची झोपडीचं घरटंच बरं होतं, असे म्हणत पावसाने उघडीप घेताच जुन्या इर्शाळवाडीचा रस्ता धरण्याच्या बेतात दरडग्रस्त ग्रामस्थ आहेत.
 
दरडीखाली कुणाचे आईवडील तर कुणाचे भाऊ बहीण आजोबा, आजी, मावशी, काका काकू दबले गेले. नियतीने घात केला. एकाकी जीवनात नव्याने सारीपाट खेळ मांडला. दरडग्रस्तांना उदरनिर्वाह नुकसान भरपाईच्या आर्थिक मदतीवर करावा लागत आहे. ती पुंजी संपली तर पुढे काय? अशा चिंतेत दरडग्रस्त दिवस ढकलत आहेत. ‘तुमच्या राजमहालापेक्षा जंगलातील झोपडीच बरी, त्या ठिकाणी जंगली रानमेवा, मासे, खेकडा, चिंबोर्‍यांवर जीवन जगता तरी येते.
 
आम्हाला आमची झोपडी प्यारी’ असे दरडग्रस्तांचे म्हणणे आहे. याबाबत चौक ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गणेश मोरे यांना विचारणा केली असता, ग्रामपंचायत कर नियमानुसार लावले असल्याचे सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी सांगितले की, दरडग्रस्तांना लावलेली घरपट्टी खूपच जास्त आहे. ग्रामपंचायत सभेत याबाबत विचारणा करण्यात येईल. तसेच नानीवली व इर्शाळवाडी या गावांसह मोरबे धरण बाधित गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, अशी मागणी केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0