थर्माकॉलला लाकडावरील मखराचा पर्याय , बाप्पाकरिता प्लायवर देखाव्यांची निर्मिती

22 Aug 2025 18:57:10
panvel
 
पनवेल | पनवेलच्या एका ज्येष्ठ कलाकाराने पाच वर्षांपूर्वी थर्माकॉलच्या मखराला पर्याय म्हणून लाकडापासून तयार केलेली मनमोहक आरासचा पर्याय शोधला आहे. यंदा त्यांनी आपले दालन नवीन पनवेल या ठिकाणी थाटले आहे. हे मखर पुढील अनेक वर्षीही वापरता येऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती तसेच छोट्या मंडळांमध्ये गणपतींसाठी थर्माकोलच्या माध्यमातून आकर्षक मखरे तयार करण्याची परंपरा होती. मात्र, त्या परंपरेला गणेशोत्सवात थर्माकोल बंदीमुळे छेद निर्माण झाला आहे. गेल्या गेल्या तीन-चार वर्षांपासून पनवेल परिसरातील बाजारपेठेत थर्माकोलची मखरे विक्रीसाठी नसतात. त्याला पर्यायी कापडी मखरे बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झालेली दिसून येत आहेत.
 
panvel
 
कामोठे येथील रहिवासी उत्तम गणपत वायाळ यांनी लाकडाचा पर्याय तयार केला आहे. १९७८ साली जे.जे आर्टसमधून बाहेर पडलेले वायाळ यांनी दिल्लीत एका नामांकित कंपनीत डिझायनर व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतर ते पेंटींगचे काम करीत आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी प्लायवर वेगवेगळ्या पेंटींग करुन आकर्षक चित्ररुपी देखावे तयार केले आहेत. त्यामध्ये महादेव, तिरुपती बालाजी, गणपती, विठ्ठल, वारकरी, सुर्यफुल, छत्रपती शिवाज महाराजांचे अप्रतिम चित्र काढून ते डेकोरेट केले आहेत.
 
त्याचबरोबर झोपडी, मंदीरसुध्दा त्यांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे अतिशय सुबक, आखीव रेखीव मखर त्यांनी तयार केल्या आहेत. ३ फुटांपासून ते १२ फुटांपर्यंतचे मखर त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर भक्त तसेच गणेशमंडळाच्या खिशाला परवडेल, याच किंमतीत ही आरास ते तयार करतात. यंदा नवीन पनवेल उड्डाणपुलाखाली अशा प्रकारचे सुंदर पेंटींगने तयार केलेले मखराचे दालन थाटण्यात आले.
 
panvel
 
निवृत्तीनंतर मी माझी कला जोपासत आहे. शासनाने थर्माकोलवर बंदी घातल्याने मी लाकडाच्या प्लायवर वेगवेगळे चित्ररूपी देखावे तयार केले आहेत. मुंबईत हा पहिलाच प्रयोग असल्याचे अनेकजण मला सांगतात. ही आरास पुढील अनेक वर्षे वापरता येवू शकते. यातून वेगवेगळे संदेश देण्याचा माझा मानस आहे. - उत्तम गणपत वायाळ, लाकडी मखर निर्माते 
 
Powered By Sangraha 9.0