रोह्यात अनधिकृत टपर्‍या जमीनदोस्त..! म्हाडा ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेसमोर प्रशासन नरमले

21 Aug 2025 19:26:20
 roha
 
रोहा | रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादादीत टपर्‍या अखेर बुधवारी (२० ऑगस्ट) जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली. म्हाडा वसाहतीचे शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते.
 
उपोषणाच्या इशार्‍यानंतर संबंधीत प्रशासनाला जाग आली आणि टपर्‍या हटविण्याची कारवाई झाली. म्हाडा वसाहतीतील ग्रामस्थ, महिलांच्या आक्रमक भूमिकेसमोर सार्वजनिक बांधकाम प्रशासन अक्षरशः नरमले. मागील दीड-दोन महिन्यांपासून अनधिकृत टपर्‍या हटवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वच प्रशासनाच्या दारी पायपीट केली. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी वारंवार दुर्लक्ष केले.
 
दुसर्‍यांची जबाबदारी म्हणत टोलवाटोलवी केली. यातून ग्रामस्थांची सहजनशीलता संपली. अखेर संबंधीत प्रशासन विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी साखळी उपोषणाचा इशारा दिला. सर्वच स्तरातून हा अनधिकृत टपर्‍यांचा मुद्दा लावून धरला गेला. त्याच घडामोडींचा धसका घेत अनधिकृत टपर्‍या हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम प्रशासन पुढे सरसावले आणि टपर्‍या जमीनदोस्त करण्यात आल्या.
 
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हाडा वसाहतीसमोरील अनधिकृत टपर्‍या हटवण्याची मोहीम हाती घेतली. तसेच धाटाव, रोठ ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्या रस्तालगत अनधिकृत टपर्‍या हटविण्यासाठी बांधकाम विभाग धाडस दाखविल का? असा सवाल उपस्थित झाला. तर म्हाडासमोरील त्रासदायक ठरणार्‍या अनधिकृत टपर्‍याहटविण्यात आल्याने ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय झाला असून, म्हाडा वसाहतीने बुधवारी मोकळा श्वास घेतला आहे.
 
ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘अनधिकृत टपर्‍या हटाव’ची मोहीम हाती घेऊन फत्ते केली. ‘कायदा बचाव, अतिक्रमण हटाव, कोण म्हणतोय हटणार नाय, हटविल्याशिवाय राहणार नाय...’ अशा घोषणा उपस्थित शेकडो म्हाडा वसाहत ग्रामस्थांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय बागुल यांनी बुधवारी अनधिकृत टपर्‍या हटविण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
 
त्यानुसार या टपर्‍या हटविण्यात आल्या. याठिकाणी म्हाडा वसाहतीचे शेकडो पुरुष, महिला उपस्थित होत्या. जोपर्यंत अनधिकृत टपर्‍या जमीनदोस्त करीत नाहीत, तोपर्यंत जागेवरुन हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अनधिकृत टपर्‍यांच्या भरावामुळे पावसाचे पाणी वसाहतीत येते. शालेय विद्यार्थी, नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. आमचे सामाजिक स्वास्थ बिघडते.
 
याबाबत संबंधीत प्रशासनाजवळ पत्रव्यवहार केला; पण कोणीच दखल घेतली नाही. अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले, पत्रकारांनी हा मुद्दा लावून धरला. टपर्‍यांमुळे रहदारीला धोका निर्माण झाला होता. आम्हा म्हाडा वसाहत, रस्ता मोकळा झाला असून पूर्ण कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ भिमेश भेकरे यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0